प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : पुणे येथे दिनांक ३१ मे ते २ जून २०२६ या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ मैदानावर होणाऱ्या राज्य वरिष्ठ गट मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा ३८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक १० व ११ मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे वरिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद व निवड मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली.
राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये धावणे, अडथळा शर्यत, स्टिपलचेस, डेकॅथलॉन, गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक तसेच २० कि.मी. चालणे या विविध प्रकारांचा समावेश आहे. पुरुष व महिला गटातील खेळाडू आगामी राज्य स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेसाठी संघव्यवस्थापक म्हणून अंकुश कलगुटगी यांची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंनी आपल्या स्पर्धेपूर्वी तीन तास अगोदर चेस्ट नंबर घेणे आवश्यक असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव संजय पाटील (मो. ९७६७५९५०५९) तसेच डॉ. प्रा. गणेश सिंहासने (मो. ७३८५३५२६२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या