मुंबई/सांगली : सोमवार दिनांक 25 मे 2026 :- सांगली जिल्ह्यात मंजूर असलेल्या “उमेद मॉल” प्रकल्पाचा पहिल्याच टप्प्यात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी “उमेद मॉल” प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी देखील 'उमेद मॉल' मंजूर झाला असून, सध्या त्याच्या प्राक्कलनाचे (अंदाजित पत्रक) काम प्रगतीपथावर आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही, ही बाब आमदार सुधीर गाडगीळ यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि सांगलीला पहिल्या टप्प्यातच प्राधान्य देण्याची आग्रही मागणी केली.
महिला सक्षमीकरणासाठी 'उमेद मॉल' आवश्यक: आमदार सुधीर गाडगीळ
निवेदन देताना आमदार गाडगीळ म्हणाले की, "सांगली जिल्ह्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण उत्पादने तयार केली जातात. ग्रामीण व निमशहरी भागातील या महिलांना त्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळणे, उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सांगलीत 'उमेद मॉल' उभारणे अत्यंत आवश्यक आहे."
पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, सांगली जिल्हा हा आधीच व्यापारी आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर व प्रगत जिल्हा आहे. अशा ठिकाणी 'उमेद मॉल' तातडीने कार्यान्वित झाल्यास महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या व विक्रीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
ग्रामविकास मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
आमदार सुधीर गाडगीळ यांनी मांडलेली बाजू आणि सांगली जिल्ह्याचे व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शविली. सांगलीच्या 'उमेद मॉल'चा पहिल्या टप्प्यात समावेश करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या