प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:निमणी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी अखेर मोठा निधी मंजूर झाला असून, माजी खासदार संजयकाका पाटिल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि निमणी ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने तब्बल ३८ लाख २७ हजार ५१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या मंजूर निधीतून बंधाऱ्याची पाया गळती काढणे, खालील बाजूस ॲप्रॉन जॅकेटिंग करणे तसेच लोखंडी बरगे बसविण्याची महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत. टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी केले आहेत.मंजूर निधीमध्ये पाया गळती काढणे व ॲप्रॉन जॅकेटिंगसाठी २१ लाख ३० हजार ९९१ रुपये, तर बंधाऱ्यास लोखंडी बरगे पुरवठ्यासाठी १६ लाख ९७ हजार ६० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.निमणी बंधाऱ्याच्या स्लॅबला तडे गेल्याने तसेच गळती वाढल्याने बंधारा धोकादायक बनला होता.परिणामी पाणीसाठा दीर्घकाळ टिकत नव्हता. याशिवाय,जुन्या लाकडी बरग्यांमुळे दरवर्षी माती भरून तात्पुरती उपाययोजना करावी लागत होती. मात्र, तरीही गळती कायम राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.दरम्यान,ग्रामपंचायतीच्या वतीने बंधारा दुरुस्तीसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला होता.यापूर्वीही बंधाऱ्यावरील नवीन स्लॅब व इतर दुरुस्ती कामांसाठी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे.नव्याने मंजूर झालेल्या निधीतून होणाऱ्या कामांमुळे बंधारा अधिक भक्कम होऊन पाणीसाठा दीर्घकाळ टिकणार असल्याने येरळाकाठच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान, चंद्रशेखर पाटोळे यांनी शासनाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संजयकाका पाटिल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या