प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळालेल्या सात जणांच्या टोळीतील दोन आरोपींना तासगाव पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या दोघांकडून तब्बल ५६ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या धाडसी कारवाईमुळे तासगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षद रमेश सागरे (वय २५) व राहूल राजेंद्र माळी (वय २३, दोघे रा. विसापूर, ता. तासगाव, जि. सांगली) यांचा समावेश आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, २३ एप्रिल रोजी खारघर (नवी मुंबई) येथे फिर्यादी सुशांत नामदेव मोरे हे त्यांचे ड्रायव्हर महेश हाटे व मित्र अभिनंदन यांच्यासह कार पार्क करून दागिन्यांची बॅग घेऊन घरी जात होते. त्यावेळी सेक्टर १२ मधील एफ लाईन कॉर्नरजवळ सात अज्ञात इसमांनी त्यांना अडवत चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि दागिन्यांची बॅग हिसकावून पलायन केले होते.या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान टोळीतील दोन आरोपी तासगाव तालुक्यातील विसापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खारघर व तासगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोघांना जेरबंद केले.आरोपींकडून ५६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. यामध्ये २४ लाखांची पिळदार सोन्याची साखळी, अशोक स्तंभ डिझाईनचे सोन्याचे पेन्डंट, गौतम बुद्ध मुखवट्याची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट तसेच अन्य दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेला चाकू व लाईटरही जप्त करण्यात आले.या कारवाईत खारघर पोलीस स्टेशनच्या पथकासह तासगाव पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक डमाळे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या