सांगली : लोकनायक शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाने एस.एस.सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये उज्ज्वल यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९१.२६ टक्के लागला असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेत कु. समृद्धी सुखदेवसिंग रजपूत हिने ८९.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु. धनश्री संतोष कोळेकर हिने ८९.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. वैष्णवी विकास माने हिने ८४.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयातून एकूण १२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, इयत्ता दहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचा शंभर टक्के निकाल यंदाही कायम राहिला आहे.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या यशासाठी विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकनायक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतमभैय्या पवार, सचिव डॉ. निलेश पत्की, सहसचिव रामचंद्र देशपांडे, संचालक अशोक गोसावी, मयुरेश पत्की, शाळा समिती अध्यक्ष डॉ. शुभदा गोखले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. जयकुमार चंदनशिवे, मुख्याध्यापक आनंदी बामणे, पर्यवेक्षक महादेव केदार यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या