प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:गौरगाव ते गौरगाव फाटा या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पायानेच डांबर व खडी निघत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले.संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत झालेले संपूर्ण काम नव्याने करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.गौरगाव गावाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून, गेल्या दोन वर्षांपासून या कामाची रखडपट्टी सुरू आहे. ठेकेदाराकडून काम वेळेत पूर्ण होत नसल्याने माजी सैनिक रामचंद्र तुकाराम पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवार दि. १६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते.त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील,पंचायत समिती सदस्य तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास ५ मेपूर्वी काम सुरू करण्याच्या लेखी सूचना दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.दरम्यान, पुन्हा सुरू झालेल्या कामात निकृष्ट डांबर मिश्रित खडी वापरली जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर आणि खडी अक्षरशः पायाने उखडत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून काम थांबवण्याची मागणी केली. सुरुवातीला ठेकेदाराने काम बंद करण्यास नकार दिला; मात्र बांधकाम विभागाने आदेश दिल्यानंतर अखेर काम थांबवण्यात आले.“गावाच्या विकासाची जीवनवाहिनी असलेला मुख्य रस्ताच निकृष्ट दर्जाचा असेल, तर गावाचा विकास कसा होणार?” असा संतप्त सवाल युवा नेते नवनाथ खराडे यांनी उपस्थित केला. तर “दोन दिवसांत योग्य पद्धतीने काम पुन्हा सुरू झाले नाही, तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे,” अशी मागणी धैर्यशील घाडगे यांनी केली.
यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता स्वप्नील पाटील, धैर्यशील घाडगे, नवनाथ खराडे, संजीत निंबाळकर, विनायक कदम, अमोल पाटील, निवास कदम, रोहन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या