प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील पालिकेच्या पथदिव्यांचा बंद पडलेला वीजप्रवाह सुरू करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी गोटेवाडी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालिका प्रशासन व संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.मृत कामगाराचे नाव मुकुंद सोपान माने (वय ५२, रा. मतकुणकी) असे आहे. ते पालिकेच्या वीज देखभाल कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने काम करत होते.मिळालेल्या माहितीनुसार,गोटेवाडी रस्त्यावरील पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद पडल्याने तो सुरू करण्यासाठी मुकुंद माने,ओंकार माने आणि इतर कर्मचारी घटनास्थळी गेले होते. वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करून मुकुंद माने खांबावर चढले. तर इतर कर्मचारी ट्रान्सफॉर्मरजवळ थांबले होते.मात्र,काही क्षणातच अचानक वायरमधून वीजप्रवाह सुरू झाला आणि खांबावर काम करत असलेल्या मुकुंद माने यांना जोरदार विजेचा धक्का बसला.गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले,परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, “बंद केलेला वीजप्रवाह अचानक सुरू कसा झाला?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागातील हलगर्जीपणा, समन्वयाचा अभाव आणि सुरक्षेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळेच एका कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मुकुंद माने यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मतकुणकी परिसरावर शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या