प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
पुणे : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येत्या १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केली आहे.
शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिर प्रकटनानुसार, विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रवेश अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. या टप्प्यात विद्यार्थी आपली प्राथमिक नोंदणी आणि आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील.
तसेच, प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती वेळोवेळी तपासून पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी या प्रवेश प्रक्रियेची नोंद घ्यावी व संबंधित माहितीचा व्यापक प्रसार करावा, असेही शिक्षण विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळ mahafyjc admissions portal उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पुढील अद्ययावत सूचना याच पोर्टलवर मिळणार आहेत. याशिवाय मदतीसाठी अधिकृत ई-मेल आयडी आणि हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
अधिकृत पोर्टल : https://mahafyjcadmissions.in
ई-मेल : support@mahafyjcadmissions.in
हेल्पलाईन : ८५३०९५५५६४
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या