प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या बहुचर्चित बायपास रस्त्याच्या कामावरून तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्यावर श्रेयवाद, लोकांची दिशाभूल आणि कामात अडथळे निर्माण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, नगरसेवक दिग्विजय पाटील आणि नगरसेवक सतीश लिंबळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदारांवर थेट निशाणा साधला.
उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान म्हणाले, “गेल्या 35 ते 40 वर्षांपासून आमदारकी एकाच घरात आहे. मात्र विकासाच्या नावाखाली जनतेची पिळवणूक आणि दिशाभूल करण्याचेच काम सुरू आहे. तासगाव बायपासच्या भिलवडी रस्ता ते विटा रस्ता या भूमी संपादन प्रक्रियेसाठी 2023 मध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आणि अनेक अडथळे दूर करण्यात आले.”
त्यांनी पुढे सांगितले की, संजयकाका पाटील यांनी श्रेयासाठी कधी राजकारण केले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु निधी मंजूर झाल्यानंतर आणि प्रक्रिया पुढे गेल्यानंतर जवळपास वर्षभराने आमदारांनी काही कार्यकर्त्यांना घेऊन प्रांत कार्यालयात बैठक घेत स्वतःचे राजकीय स्टंटबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक दिग्विजय पाटील यांनी सांगितले, “गेल्या तीन ते चार वर्षांत बायपाससाठी सात ते आठ वेळा शेतकऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. मी स्वतः त्या सर्व प्रक्रियेचा साक्षीदार आहे. संजयकाका पाटील यांनी गावाचा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवला. मात्र आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सुरुवातीपासून या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम केले. लोकांची दिशाभूल करून स्वतःचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
नगरसेवक सतीश लिंबळे यांनीही आमदारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “आमचे नेते पाप-पुण्य जपणारे आहेत. त्यांनी कधी पोस्टरबाजी करून प्रसिद्धी मिळवली नाही किंवा न केलेल्या कामाचे श्रेय घेतले नाही. मात्र सध्याचे आमदार मोठमोठे पोस्टर लावून जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रत्यक्षात केलेल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी दुसऱ्यांच्या श्रमावर स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद पैलवान यांनी सांगितले की, बायपास प्रकल्पांतर्गत दोन शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “आम्ही केवळ राजकारणासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि तासगावचा वाहतूक प्रश्न कायमचा सुटावा यासाठी लढत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तासगाव बायपासच्या श्रेयावरून सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा तापले असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काम कमी, त्यात पण परत टक्केवारी आहेच आणि राडाच जास्त अशी आपल्या नेते मंडळींची स्थिती आहे. कामापेक्षा श्रेया साठी हपापलेली ही मंडळी बघून हे आपले नेते आहेत याची जनतेला लाज वाटायला पाहिजे पण तसे होत नाही म्हणून या लोकांचे फावले आहे.
उत्तर द्याहटवा