प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली-तासगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर संतप्त जमावातून एका तरुण वकिलाची सुटका करत मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या शिवसैनिकाबद्दल पुण्यातील ॲडव्होकेट केदार देशपांडे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मनःपूर्वक आभार मानले आहेत.
पुण्यात वकिली व्यवसाय करणारे ॲडव्होकेट केदार देशपांडे हे २२ एप्रिल २०२६ रोजी सांगली येथील सेशन कोर्टातील काम आटोपून कारने पुण्याकडे निघाले होते.कवठे एकंद गावाजवळील एका अरुंद वळणावर त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या होंडा सिटीला जोरदार धडक बसली.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला.अपघातामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी देशपांडे यांच्यावर संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली.परिस्थिती हाताबाहेर जात असताना जमावाकडून मारहाण होण्याची भीती निर्माण झाली होती.याचवेळी तिथून जात असलेले सावर्डेचें शिवसैनिक प्रदीप माने पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतून उतरून जमाव शांत केला.त्यांनी देशपांडे यांची विचारपूस करून पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्वतः तिथे थांबून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
या प्रसंगामुळे मोठा अनर्थ टळल्याचे देशपांडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. "कोणतीही ओळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने प्रदीप माने पाटील यांनी केलेली मदत आयुष्यभर विसरणार नाही.शिवसेना केवळ भाषणात नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर लोकांसाठी उभी असते,याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.शिवसैनिकाच्या या निस्वार्थ मदतीमुळे भारावलेल्या देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत ही बाब पोहोचावी,तसेच अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात पक्षाविषयी विश्वास वाढत असल्याची भावना व्यक्त करत आभार मानले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या