प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तालुक्यातील शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यामुळे अनेक वर्षांपासून अनिश्चिततेत जीवन जगणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार अतुल पोटोळे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि प्रांताधिकारी समाधान शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची अंमलबजावणी तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना आता त्यांच्या निवासस्थानी अधिकृत हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.शासनाच्या नव्या धोरणानुसार ५०० चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण पूर्णपणे मोफत नियमित केले जाणार आहे. तर ५०० ते १५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे. मात्र १५०० चौरस फुटांपेक्षा अधिक अतिक्रमणांवर हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेत व्यावसायिक वापराची बांधकामे पूर्णपणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, एका कुटुंबाला केवळ एकच अतिक्रमण नियमित करता येणार असून, नियमित करण्यात आलेली जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच या जमिनीची पुढील पाच वर्षे विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही.योजनेअंतर्गत नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वनजमीन आणि धोकादायक क्षेत्रांमधील अतिक्रमणे नियमित केली जाणार नाहीत. गायरान जमिनीवरील काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार थेट जमीन न देता पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत निवास उपलब्ध करून देण्याची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले अर्ज ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्याकडे तर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावेत. अर्जासोबत १ जानेवारी २०११ पूर्वीच्या वास्तव्यासंदर्भातील पुरावा जोडणे बंधनकारक आहे. यामध्ये मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, नमुना ८-अ किंवा सर्वेक्षण नोंद यांचा समावेश असू शकतो. याशिवाय चालू वर्षातील रहिवासाचा शासकीय पुरावाही आवश्यक राहणार आहे.
महसूल प्रशासनाने नागरिकांना वेळेत अर्ज सादर करून आपले निवासस्थान कायदेशीर करण्याचे आवाहन केले आहे. अर्जाचा नमुना संबंधित ग्रामसेवकांकडे विनामूल्य उपलब्ध असून, नागरिकांनी अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करून त्याची पोहोच पावती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे तासगाव तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या डोक्यावर असलेली अनिश्चिततेची तलवार दूर होणार असून, स्वतःच्या घरावर कायदेशीर हक्क मिळविण्याची मोठी संधी नागरिकांसमोर उपलब्ध झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या