तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीने पालिकेतील राजकीय संघर्ष उघडपणे समोर आला. अवघ्या एका मिनिटात सभा आटोपून सर्व विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला, तर नगरसेवक अरुण साळुंखे यांनी थेट सभागृहाच्या दरवाजालाच कडी लावत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ पालिकेचे वातावरण तणावपूर्ण बनले होते.नगराध्यक्षा सौ विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेला सुरुवात झाली. सभा सुरू होताच नगरसेवक संतोष बेले यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकत्रित मंजूर करण्याची सूचना मांडली. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्यास तात्काळ अनुमोदन दिले आणि अवघ्या मिनिटभरात सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. विरोधी नगरसेवकांनी याला लोकशाहीचा गळा घोटणारा प्रकार म्हणत तीव्र आक्षेप नोंदवला.शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. शहरातील अनेक विकासकामे रखडली असतानाही त्यावर चर्चा होऊ दिली जात नाही, सभागृहात जाणीवपूर्वक बोलण्याची संधी नाकारली जाते, तसेच विविध समित्यांच्या बैठकींना विरोधी नगरसेवकांना डावलले जाते, असा आरोप त्यांनी केला.
“सत्तेत आलो म्हणजे पालिका स्वतःची मालमत्ता झाली असा काही अर्थ होत नाही. विरोधकांना जाणीवपूर्वक दूर ठेवून कारभार मनमानी पद्धतीने चालवला जात आहे,” असा आरोप विरोधी गटाने केला.
विरोधकांनी पालिकेच्या कार्यक्रमांबाबतही नाराजी व्यक्त केली.“पालिकेच्या निधीतून होणारे कार्यक्रम राजकीय रंग देऊन राबवले जात आहेत.खर्च पालिकेचा आणि प्रसिद्धी मात्र सत्ताधाऱ्यांची,असा प्रकार सुरू आहे,” असा आरोप सभागृहात करण्यात आला. विशेषतः शिक्षण विभागाच्या कार्यक्रमांची माहिती नगरसेवकांना दिली जात नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
सभागृहात आपले म्हणणे मांडण्याची संधी नाकारल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्या दालनात धाव घेतली. दरम्यान, संतप्त झालेल्या नगरसेवक अरुण साळुंखे यांनी सभागृहाच्या दरवाजालाच कडी लावत, “उत्तर दिल्याशिवाय कोणीही बाहेर जाणार नाही,” अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांची उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांच्याशी जोरदार शाब्दिक चकमक झाली. वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसताच सत्ताधारी पदाधिकारी आणि काही नगरसेवक सभागृहाबाहेर निघून गेले.या सर्व घडामोडींनंतर नगराध्यक्षा सौ विजया पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
“विरोधी नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. पालिकेच्या सर्व कार्यक्रमांना त्यांना सन्मानाने निमंत्रित केले जाते; मात्र अनेकदा त्यांच्याकडूनच प्रतिसाद मिळत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, “पालिकेच्या शिक्षण विभागाचा कार्यक्रम स्वखर्चातून करण्यात आला असून त्यासाठी पालिकेचा कोणताही निधी वापरण्यात आलेला नाही. गटतट न पाहता तासगावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पालिकेच्या मासिक सभेत घडलेल्या या प्रकारामुळे तासगावच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या काळात हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी पालिकेच्या सभागृहात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे रणांगण रंगल्याने शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या