सांगली : रॉबिन हूड अकॅडमी, सांगलीतर्फे “मिशन ॲडमिशन २०२६–२७” अंतर्गत झोपडपट्टी भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे तसेच शिक्षणाविषयी जनजागृती करणे या उद्देशाने विशेष प्रवेश व कागदपत्र सहाय्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ७ येथे पार पडणार आहे. या उपक्रमाद्वारे ७० हून अधिक मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये पुढील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे :
वंचित व शाळेबाह्य मुलांची शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देणे
आधार कार्ड, जन्म दाखला, राहण्याचा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर शालेय गरजांसाठी मदत करणे
हा उपक्रम रॉबिन हूड आर्मी व रॉबिन हूड अकॅडमी यांच्या “मिशन ॲडमिशन” मोहिमेअंतर्गत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्ट्स सर्कलमधील विद्यार्थी व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने तसेच महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ७ यांच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व तेजस रोकडे करत असून, झोपडपट्टी भागातील व इतर शाळेबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
रॉबिन हूड अकॅडमी ही रॉबिन हूड आर्मीची शैक्षणिक शाखा असून, ‘Zero Funds’, राजकारणापासून दूर आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वावर कार्य करणारी संस्था आहे. देशातील २०३ हून अधिक शहरांमध्ये अकॅडमी शाळा प्रवेश, शैक्षणिक सहाय्य व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आर्ट्स सर्कल हा बी.टेकच्या प्रथम ते चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा एक सक्रिय सांस्कृतिक विद्यार्थी क्लब असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या