प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रा. लि. येथे आगामी गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या कराराचा शुभारंभ आज कारखाना कार्यस्थळावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आगामी हंगाम सुरळीत आणि नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासनाने वेगाने पावले उचलल्याचे यावेळी स्पष्ट झाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. डॉ. पतंगराव कदम व स्व.भारतीताई लाड यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्रभाऊ लाड, युवा उद्योजक रोहनदादा लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील, तसेच उपस्थित वाहन मालक आणि तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले.कारखान्याचे शेती अधिकारी संजय मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सर्वप्रथम करार करण्याचा मान मिळालेल्या पहिल्या ११ वाहन मालकांचा राजेंद्रभाऊ लाड आणि रोहनदादा लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्रआप्पा लाड आणि कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गळीत हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कारखान्यातील नवीन ५००० मे.टन क्षमतेचा प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या ऊस नोंदणीचे कामही सुरू करण्यात आले आहे.तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सर्व उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे तातडीने कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले. ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार असून कार्यक्षेत्रातील व परिसरातील वाहन मालकांनी कारखान्याशी करार करून या व्यवसायात सहभागी व्हावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जनरल मॅनेजर (टेक्निकल) विकास सूर्यवंशी, ऊस पुरवठा अधिकारी विशाल पाटील, सुजित मोरे, जितेंद्र डुबल, फायनान्स अकाउंटंट सूर्यकांत पाटील, तसेच अनेक वाहन मालक, शेती विभागाचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या करार शुभारंभामुळे भारती शुगर्सने नियोजनबद्ध आणि सक्षम हंगामाची नांदी दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या