प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: रॉबिन हूड अकॅडमी, सांगलीतर्फे “मिशन ॲडमिशन २०२६–२७” अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ७ येथे विशेष प्रवेश व कागदपत्र सहाय्य शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.
वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे तसेच शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे ७० हून अधिक मुलांना प्रवेश व आवश्यक सहाय्य देण्यात आले.
हा उपक्रम रॉबिन हूड आर्मी व रॉबिन हूड अकॅडमी यांच्या “मिशन ॲडमिशन” मोहिमेअंतर्गत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्ट्स सर्कलमधील विद्यार्थी व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने तसेच महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ७ यांच्या पाठिंब्याने आयोजित करण्यात आला.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आर्ट्स सर्कल हा एक सक्रिय विद्यार्थी क्लब असून, तो विद्यार्थ्यांमधील कला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतो. या क्लबचे सदस्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच गरजू रुग्णांना मदत करण्याचे कार्य सातत्याने करत असतात.
या उपक्रमाचे नेतृत्व तेजस रोकडे यांनी केले. वंचित, झोपडपट्टी भागातील व इतर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
रॉबिन हूड अकॅडमी ही रॉबिन हूड आर्मीची शिक्षण शाखा असून, स्वयंसेवकांच्या माध्यमातून ‘Zero Funds’, राजकारणापासून दूर आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वावर कार्य करणारी संस्था आहे. देशातील २०३ हून अधिक शहरांमध्ये अकॅडमी शाळा प्रवेश, शिक्षण सहाय्य व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
तेजस रोकडे म्हणाले “प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे. कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. मिशन ॲडमिशन २०२६–२७ च्या माध्यमातून प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळावी आणि त्याचे भविष्य घडावे, हा आमचा प्रयत्न आहे.” स्वयंसेवकांनी सांगितले “एखाद्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देणे म्हणजे केवळ एक फॉर्म भरून देणे नाही, तर त्याच्या भविष्याचे एक नवीन दार उघडणे आहे. मिशन ॲडमिशन २०२६–२७ हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
रॉबिन हूड अकॅडमी, सांगलीतर्फे नागरिक, स्वयंसेवक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व माध्यमांना या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या