तासगाव : प्रतिष्ठा फौंडेशनच्या वतीने तासगाव येथे दशक महोत्सवी प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजन केले आहे. येथील समृध्दी मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १० वाजता संमेलन सुरू होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत संपादक वसंत भोसले, स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम, कवी संमेलनाध्यक्ष बलसाहित्यिक महेशकुमार कोष्टी आहेत. गेली दहा वर्षे आम्ही तासगाव येथे संमेलनाची परंपरा जोपासत आहोत. हे दशक महोत्सवी वर्ष असल्याने प्रचंड उत्साह आहे. राज्यभरातील साहित्यिक मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी दिली.
तानाजीराजे जाधव म्हणाले, तासगाव तालुक्याला सर्कस, कला आणि साहित्याची मोठी परंपरा आहे. राज्य, देश तसेच अंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक विचारवंत येथे घडले आहेत. परंतु येथे एकही साहित्य संमेलन होत नव्हते. प्रबोधनाची चळवळ पुढे न्यावी, साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची परंपरा आम्ही प्रतिष्ठा फौंडेशनच्या माध्यामतून सन २०१७ ला सुरू केली. आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक श्यामसुंदर सोन्नर, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, उत्तम कांबळे, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रबोधनकार इंद्रजीत देशमुख, डॉ. भारत पाटणकर, प्राचार्य डॉ. सुनिलकुमार 'लवटे, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे अशा दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. यावर्षी ११ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबूराव गुरव हे संमेलन अध्यक्ष आहेत. परिवर्तनवादी विचारवंत म्हणून त्यांची देशभर ख्याती आहे. ज्येष्ठ विचारवंत ज्यांनी आपल्या लेखणीतून सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली ते संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीपआप्पा कदम हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. कृषि मदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर मोठे कार्य उभे केले आहे. त्यांच्या अनुभवातून संमेलन निश्चितपणे यशस्वी होणार आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष बालसाहित्यिक महेशकुमार कोष्टी यांचे नावही राज्यभर गाजत आहे. तर सोलापूरच्या ज्येष्ठ कथाकार संध्या धर्माधिकारी यांचे कथाकथन होणार आहे.
तासगावचे तहसिलदार अतुल पाटोळे, अर्थतज्ज्ञ प्रा. संजय ठिगळे, राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, माजी प्राचार्य व्ही. एच. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक दी. बा. पाटील, भिमराव धुळुबुळु हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कारांचे मान्यवरांच्याहस्ते वितरण केले जाणार आहे. साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांना प्रतिष्ठा ग्रंथरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे ३०० साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील साहित्यिक व रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तानाजीराजे जाधव यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या