प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 9 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त दि. 8 ते 14 एप्रिल कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत आज अंधश्रद्धा निर्मूलन आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा प्रचार व प्रसार बाबत एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा वसंतदादा पाटील इन्टिट्युट ऑफ मॅनेंजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च सेंटर सांगली येथे संपन्न झाली. कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, सहाय्यक लेखाधिकारी संजय कुलकर्णी, वसंतदादा पाटील इन्टिट्युट सांगलीचे प्राचार्य डॉ. रावसाहेब यल्लाठी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस) सांगली शहर शाखेच्या कार्याध्यक्ष आशा धनाले, सांस्कृतिक विभाग प्रमुख त्रिशला शहा, समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी, प्रकल्प अधिकारी (समतादूत, बार्टी), सर्व समतादूत, महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम यांनी अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता निर्माण होऊन अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होईल असे सांगून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी आशा धनाले व त्रिशला शहा यांनी समाजातील वाढत्या अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मार्गदर्शन केले. सादर केलेल्या लघुनाटिकेतून अंधश्रद्धेमुळे सामान्य माणसाची होणारी फसवणूक आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याबाबत कलमनिहाय पोस्टरांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चित्रांच्या माध्यमातून भोंदूगिरीचे पितळ कसे उघडे पडते, हे प्रभावीपणे मांडण्यात आले होते. हे चित्रदालन जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी दिवसभर खुले ठेवण्यात आल्याने नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन करुन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या