प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरातील गणपती मंदिरासमोरील धोकादायक वळणावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दीपक वसंत हिंगमिरे (वय ५३, रा. सूर्यवंशी गल्ली, गुरुवार पेठ, तासगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये विटा एसटी डेपो विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे,काही महिन्यांपूर्वीच हिंगमिरे यांच्या पायावर उसाची ट्रॉली पडून गंभीर अपघात झाला होता.त्या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते आणि हळूहळू चालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र,नियतीचा क्रूर खेळ पुन्हा त्यांच्या वाट्याला आला आणि अखेर त्यांचा जीव गेला.
मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास दीपक हिंगमिरे हे गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले होते.दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांनी समोरील दुकानातून दूध घेतले. याचवेळी सांगलीहून विट्याकडे जाणाऱ्या एस.टी. बसने त्यांना जोरदार धडक दिली.धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले.बस चालकाला तत्काळ बस थांबवता न आल्याने बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.हा थरारक अपघात अनेक नागरिकांच्या डोळ्यासमोर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान,अपघात घडलेले गणपती मंदिरासमोरील वळण हे कायमच धोकादायक ठिकाण म्हणून ओळखले जाते.येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी, रस्त्यावर होणारी दुचाकी-चारचाकींची अनियंत्रित पार्किंग,तसेच मंदिर परिसरातील गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. या ठिकाणी तातडीने वाहतूक नियंत्रण उपाययोजना राबवण्याची जोरदार मागणी होत आहे.हिंगमिरे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने गुरुवार पेठ परिसरासह बाजार समिती आवारात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची नोंद तासगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या