प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे बी.एड द्वितीय वर्ष (2024-2026) प्रशिक्षणार्थींचा सदिच्छा समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. “स्वप्नांना पंख देणारा प्रवास” या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत भविष्यासाठी नवी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आरती जाधव यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींना विद्यार्थी संसदेमधील सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बी.एड प्रथम वर्षातील प्रशिक्षणार्थींनी द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी दोन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव, आठवणी आणि शिकवण मांडत उपस्थितांना भावूक केले.प्राध्यापक मनोगतात डॉ. एल. व्ही. भंडारे, डॉ. डी. टी. खजूरकर, डॉ. ए. एस. चिखलीकर, प्रा. ए. आर. पंडित आणि प्रा. प्रमोद शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांनी सांगितले की, “सदिच्छा समारंभ हा केवळ निरोपाचा कार्यक्रम नसून आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि सुंदर टप्पा आहे. बी.एड हा शिक्षण क्षेत्रातील भक्कम पाया घालणारा प्रवास असून, यामध्ये मिळालेले अनुभव, ज्ञान आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारे ठरतात.”कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रमोद शेंडगे यांनी केले. यावेळी प्रशासकीय सेवक संजय कुंभार, हणमंत वाघमारे व अस्मिता साळी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.आरती जाधव यांनी केले. सूत्रसंचालन कु. रुचिता घोडके व कु. मोनिका जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन कु. मंजिरी साळुंखे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली.
या सदिच्छा समारंभाने विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी कोरल्या असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा व आत्मविश्वास दिला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या