प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मुंबई : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत वाहतूक शाखेकडून राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी ड्युटीदरम्यान दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदर आदेशानुसार, महाराष्ट्र राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकी अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यू व गंभीर दुखापतींचे प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असून त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
तसेच, Bloomberg Philanthropies यांच्या Initiative for Global Road Safety अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, मुंबई व नागपूर शहरांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण तुलनेने जास्त असले तरी इतर शहरांमध्ये ते अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतः नियमांचे पालन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर आदेशानुसार, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ड्युटीदरम्यान दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरणे बंधनकारक असून, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर परिपत्रकाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात येणार असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये तसेच महामार्ग पोलीस यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या