प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ५० विद्यार्थिनींपैकी तब्बल २५ विद्यार्थिनींची विविध शाळांमध्ये शिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना थेट संधी उपलब्ध झाली आहे.तासगाव परिसरातील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर (तासगाव), महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (मणेराजुरी), श्री सिद्धनाथ हायस्कूल (आरवडे), विठ्ठलराव पागे विद्यामंदिर (चिंचणी), आयडियल इंग्लिश स्कूल (तासगाव), न्यू इंग्लिश स्कूल (कवठे एकंद), नव कृष्णा व्हॅली स्कूल (तासगाव), बाळासाहेब देसाई हायस्कूल (वायफळे) आणि गांधले पब्लिक स्कूल (तासगाव) या नामांकित शाळांमध्ये विविध विषयांच्या शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखतींसाठी अनुभवी विषयतज्ञांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये श्रीमती सविता मधुकर कोळेकर,लक्ष्मण श्रीरंग खोत, राजेंद्र शंकर पाटोळे, सौ.जयश्री मारुती माने, सौ.सीमा सूर्यवंशी आणि शंतनू रत्नाकर राऊळकर (पद्मभूषण वसंतरावदादा पाटील कॉलेज, तासगाव) यांचा समावेश होता.
मुलाखतीदरम्यान गणित,विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांसाठी शिक्षकांची सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले.तसेच भविष्यात शिक्षकांची गरज वाढल्यास संबंधित शाळांकडून महाविद्यालयाशी संपर्क साधण्यात येईल,असेही संकेत देण्यात आले.
या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव मिळावा, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा हे होते. प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने करिअरच्या दिशेने पावले टाकावीत, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
कॅम्पस मुलाखतींचे आयोजन विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मी भंडारे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच डॉ. लक्ष्मी भंडारे, डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी संजय कुंभार, हणमंत वाघमारे आणि सौ.अस्मिता साळी यांनी विशेष परिश्रम घेतले.एकूणच, या कॅम्पस मुलाखतींमुळे विद्यार्थिनींसाठी रोजगाराच्या संधी खुल्या झाल्या असून, शिक्षण क्षेत्रात सक्षम व आत्मविश्वासू शिक्षक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या