प्रतिष्ठा न्यूज
बारामती प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी कार्यकर्ते , दिग्गज नेत्यांसह देशभरातून जनसागर लोटला होता . दादा परत या! अशी आर्त हाक कार्यकर्त्यांनी दिली.
मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी अंत्यसंस्काराआधी धार्मिक विधी आणि पूजा केली. यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दोन्ही मुलांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला.
ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबिय उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ,रक्षा खडसे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाह राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदराजंली वाहिली.
दादा परत या
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता. यावेळी अजित पवार अमर रहे! अशा घोषणा देत असतानाच ‘परत या परत या अजितदादा परत या, अशी आर्त हाक कार्यकर्त्यांनी दिली. उपस्थितांची मने हेलावून गेली.
अजितदादा पवार यांचं काल (बुधवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास वयाच्या ६६ व्या वर्षी बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर पाच जणांचाही मृत्यू झाला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामार्फत (DGCA) या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या