प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात निर्माण होत असलेले तणावपूर्ण वातावरण, कुटुंबातील फाटाफुटीची शक्यता आणि गावागावांत वाढत चाललेला असंतोष लक्षात घेता युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील यांनी मोठा आणि धाडसी निर्णय घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)’ कडून एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करूनही त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सोमवारी रात्री चिंचणी येथे झालेल्या निर्णायक बैठकीत प्रभाकर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “काही लोक जाणीवपूर्वक गावात भांडणे पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला सत्तेसाठी गाव पेटवायचे नाही.कुटुंब आणि गावाचा सलोखा आमच्यासाठी सर्वोच्च आहे.”
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचणीसह परिसरातील गावांमध्ये वातावरण इतके ताणले गेले होते की चौकात नागरिक थांबायला तयार नव्हते,एकमेकांशी बोलणे टाळले जात होते आणि घराघरांत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.ही परिस्थिती भविष्यात गंभीर संघर्षाला कारणीभूत ठरू शकते,याची जाणीव होताच प्रभाकर पाटील यांनी स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी सखोल चर्चा केली तसेच गावातील ज्येष्ठ व जाणकार नागरिकांचे मार्गदर्शन घेतले. “जिल्हा परिषद सदस्य पद माझ्यासाठी मोठे असले तरी गावांतील शांतता त्याहून मोठी आहे.मी निवडणूक लढवणार नाही,पण जनतेसाठीचे काम थांबवणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.यावेळी संजयकाका पाटील यांनीही स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की, “आम्हाला सत्तेचे नाही तर लोकांच्या हृदयातले स्थान हवे आहे.कुटुंबातील संघर्ष आणि गावातील भांडणे आम्हाला मान्य नाहीत.”या निर्णयामुळे संजयकाका पाटील यांच्या कुटुंबातील दोन भाऊ आमने-सामने येण्याचा संभाव्य संघर्ष पूर्णतः टळला असून,चिंचणी व परिसरात होऊ घातलेला मोठा राजकीय आणि सामाजिक तणाव निवळल्याचे चित्र आहे.अधिकृत माघार वेळेआधीच,सायंकाळी तीन वाजेपर्यंत प्रभाकर (बाबा) पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.
राजकीय स्वार्थावर मात करत सलोखा,संयम आणि सामाजिक जबाबदारी जपणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या