प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी 2026 रोजी राज्यभर “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
हा उपक्रम राज्यातील प्रमुख शहरांमध्ये — पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि कोल्हापूर — येथे आयोजित करण्यात आला. ज्या मध्ये भारताच्या ईशान्य कडील सात राज्य ( सेव्हन सिस्टर्स ) मधील विद्यार्थ्यांचा अधिक व्यापक सहभाग नोंदविण्यात आला.
सांगली व मिरज शहरामध्ये वालचंद इंजीनियरिंग कॉलेज, भारती मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी शिक्षणासाठी व त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या ईशान्य कडील राज्यांतील विद्यार्थ्यांना सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून घेण्यात आले होते.
या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस परेड ग्राउंड वर झालेल्या भारदस्त कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड तसेच लक्षद्वीप या राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्य कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी चहापाना च्या निमित्ताने प्रत्यक्ष संवाद साधला.
संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांचे अनुभव व अडचणी मांडल्या. पोलीस दल व प्रशासनातर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य व संरक्षणाची हमी देण्यात आली. डायल-112 आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख, तसेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. सर्व आमंत्रित विद्यार्थी पोलिसांच्या आदरातिथ्याने व आपुलकीच्या वागणुकीमुळे खुश व समाधानी झाले. त्यांनी त्यांच्या भावना उस्फूर्तपणे व्यक्त करून सांगली पोलीस व महाराष्ट्र शासन यांचे आभार मानले. या उपक्रमास चांगल्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली.
एकूणच, “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला असून, ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास तो उपयुक्त ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या