सांगली, दि. 26 : खरीप 2026 हंगामातील परिस्थितीच्या आधारे कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्यमानातील तूट तसेच अन्य घटकांचा विचार करून या तालुक्यांमध्ये राज्य शासनाने Trigger-1 लागू करण्यात निर्णय घेतला आहे.
खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात सांगली जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा समावेश करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बळीराजाने घाबरून जाऊ नये. राज्य शासन बळीराज्याच्या पाठीशी खंबीरपणे आणि संवेदनशीलपणे उभे आहे. गेल्या आठवड्यातच याबाबत प्रशासनाला निर्देश दिले असून, नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी व जनावरांना चारा याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता जिल्ह्यातील जत. आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांचा ट्रिगर 1 मध्ये समावेश झाला असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या सवलती व उपाययोजनांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शासनाने लागू केलेल्या सर्व सवलती व उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या