मिरज : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आणि प्रबोधन शाहिरी कलापथक संस्था, इचलकरंजी यांच्या सहकार्याने संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल, मिरज येथे ‘श्री गणेश लोककला सांस्कृतिक कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल ३४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. यावेळी प्रबोधन शाहिरी कलापथकाचे अध्यक्ष राष्ट्रशाहीर इंदूराव लोंढे प्रमुख पाहुणे तर सीबीएसई स्कूलचे प्रशासक रफिक तांबोळी आणि प्रबोधन शाहिरी कलापथकाचे सचिव प्रशांत पोवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाहिरी, पोवाडा, मंगळागौरीचे खेळ, लावणी आणि गोंधळ अशा विविध लोककला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण केले. राष्ट्रशाहीर इंदूराव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोककलांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
गणेश सुरेश देसाई यांनी हलगी वादन व लेझिमचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली, तर गणेश मागाडे यांच्या ढोलकी वादनाने वातावरण भारावून गेले. शाळेचे कलाशिक्षक दादा मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तबलावादन तसेच झांज पथकात उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीकमसलत, समन्वयिका विद्या घुगरे, रुबीना नदाफ, प्रणाली ललित यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, कार्यकारी विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, विश्वस्त प्रदीप पाटील आणि संकुल समन्वयक डॉ. सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या