प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:वैयक्तिक जीवनापासून राष्ट्रजीवनापर्यंत सर्वच क्षेत्रांत संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीचा मानसिक तोल ढासळल्यास त्याचे नुकसान होते,तर राष्ट्राचे संतुलन बिघडल्यास संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीला बाधा येते.त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखणे हाच खरा ‘सुतोल’ आहे,असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी श्री दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक व महाआरती करण्यात आली.त्यानंतर नामजप व प्रवचन झाले.राष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध समाजघटकांनी परस्परविरोध न करता समन्वयाने काम करण्याची गरज आहे.चुकीचा निर्णय हट्टाने रेटण्याऐवजी तो मागे घेणे हा पराभव नसून विवेकाचे लक्षण आहे.समाजमाध्यमांवरील अफवांमुळे सामंजस्याचा पूल ढासळू देऊ नये,असे आवाहनही महाराजांनी केले.धर्म आणि विज्ञान,परंपरा आणि परिवर्तन तसेच बुद्धी,भावना व कष्ट करणारे हात यांच्यात समतोल साधल्यास सुसंवादी राष्ट्र निर्माण होईल.स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,तर देश आणि विश्वाच्या कल्याणाचा विचार करून वागणे हाच खरा ‘सुतोल’ असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सुरज शंकर पाटील यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.विविध भागांतून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री दत्तगुरूंचे व परमात्मराज महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या