प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नेहरूनगर येथील मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत प्रशस्त समाजमंदिर मंजूर करण्याची मागणी वारंवार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मात्र,अनेक वर्षांपासूनची ही मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याचा आरोप करीत मातंग समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.एकीकडे समाजमंदिराची रास्त मागणी प्रलंबित असताना दुसरीकडे एकाच रस्त्यावर वारंवार विकासकामे करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित रस्त्यावर पूर्वी मुरमीकरण, त्यानंतर काँक्रीट रस्ता आणि पुन्हा त्याच ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले.आता पुन्हा त्याच ठिकाणी नवीन रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे संबंधित कामाची निविदा अंतिम झालेली नसतानाही कामासाठी खडी व क्रश सँड जागेवर आणण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्रस्तावित रस्त्याच्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.‘एकाच रस्त्यावर वारंवार खर्च,मग समाजमंदिरासाठी निधी का नाही?’ असा सवाल उपस्थित करीत उपलब्ध निधीतून मातंग समाजाच्या समाजमंदिराला प्रथम प्राधान्य देऊन मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी केवळ विकासाची नसून सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही महत्त्वाची असल्याचे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,समाज कल्याण विभाग,विभागीय आयुक्त तसेच अन्य सक्षम प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तसेच माहितीचा अधिकार, लोकायुक्त आणि इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.याबाबत गटविकास अधिकारी,पंचायत समिती तसेच सभापती, पंचायत समिती यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या