पलूस, दि. ८ : माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सर्वसामान्यांशी नाळ जोडून काम करणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर योगदान देणारे डॉ. डी. वाय. पाटील हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांनी व्यक्त केल्या.
पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, “कोल्हापूरजवळील अंबप या गावात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रासह देशाच्या सार्वजनिक जीवनात स्वतंत्र ठसा उमटविला. काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम करताना कोल्हापूर नगरपालिकेतील नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांची कायम नाळ जोडलेली होती.”
राजकारणासोबतच डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्राला आपल्या कार्याचे प्रमुख माध्यम बनविले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या शिक्षणसंस्थांनी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत तसेच परदेशातही आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, असेही कदम यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेली भक्कम शैक्षणिक व्यवस्था ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.”
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांनी राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली. विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली. सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.
“अशा या थोर विभूतींचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिक्षण, राजकारण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे प्रदीपआप्पा कदम यांनी सांगितले.
यावेळी अनिल पाटील, आशुतोष पाटील, अभिजीत कौलगे, अभयसिंह भोसले, रणजीत शिंदे, अमीर पठाण, तुषार सूर्यवंशी, विकी तातुगडे, आदित्य धनवडे, राहुल पाटील, निवास गायकवाड, सागर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या