पलूस प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके नेते तथा उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत पलूस तालुक्यातील बांबवडे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ व २ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज असून, केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, “वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाची भावना रुजली पाहिजे. आज लावलेले एक रोप भविष्यात अनेकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला किंवा विशेष प्रसंगी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.”
स्व. अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहातून समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही प्रदीपआप्पा कदम यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक आणि शेतकरी अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वृक्षारोपण कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसराला हिरवाईची नवी किनार मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास भास्कर संकपाळ, राजेश पवार, अनिल पाटील, विकास कदम, विष्णुपंत कदम (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस), तोफिक मुल्ला, सागर कदम, राहुल पाटील, सरपंच अरविंद मदने, सुनील भोसले, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, महेश माळी, उल्हास पाटील, रणजीत शिंदे, शैलेश साळुंखे, गौरव सपकाळ, गणेश परीट यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या वृक्षारोपण उपक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या