मिरज दि.८: गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉ. अभिजीत साहेबराव डुबल याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी २०२३ अंतिम वर्षाच्या होमिओपॅथीक पदवी (बीएचएमएस) परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वसाधारण प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच रेपरटरी आणि प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन या विषयांमध्येही प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मान पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल दि. २८ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे झालेल्या २५ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा कुलपती मा. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. अभिजीत डुबल यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. अभिजीतच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, कार्यकारी विश्वस्त ॲड. वीरेंद्रसिंह पाटील, सर्व विश्वस्त, कॅम्पस कोऑर्डिनेटर, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, “आज संस्थेच्या मुकुटामध्ये अभिजीतने एक हिरा लावला आहे. त्याने मिळवलेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. हीच यशाची आणि गुणवत्तेची परंपरा आमचे पुढील विद्यार्थीही कायम राखतील.” असे सांगत त्यांनी डॉ. अभिजीत डुबल याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अभिजीत डुबलच्या या दैदिप्यमान यशामुळे गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या