सांगली प्रतिनिधी : येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात सुमारे 2000 महिला पालकांच्या उपस्थितीत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्ट. जन. एस. पी. पी. थोरात अकॅडमी व डे बोर्डिंग यांच्यावतीने श्रावणातील पहिला सण अर्थात नागपंचमीच्या निमित्ताने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . या निमित्ताने आयोजित
' पिंगा ग पोरी पिंगा' या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत महिलांनी सणाची रंगत वाढवली. शिक्षणासह संस्कृती- परंपरा जपणाऱ्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमीचा मोठा दिमाखदारदार पद्धतीने साजरा झाला . यानिमित्ताने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नागांच्या विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या .यामध्ये वारली, झुंबर ,माठावरील, झाडावरील, कार्टून, बॉलीवूड, रुद्रावतार, कालिया मर्दन आदी विविध प्रतिकृतींसह मध्यवर्ती ठिकाणी वारुळाची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर २० ते २५ फूट लांब अॅनाकोंडा हे या नागपंचमीचे खास आकर्षण ठरले. सां.मि.कु महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील व शांतिनिकेतन कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.समिता पाटील यांच्यासह पालक प्रतिनिधींच्या हस्ते पाच फण्यांच्या मुख्य नागमूर्तीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी आयोजित ' पिंगा ग पोरी पिंगा' या कार्यक्रमात स्नेहल शिर्के यांनी निवेदन करत उपस्थित महिला पालकांसाठी विविध रंगतदार खेळ घेतले. यामध्ये महिला पालकांसह पुरुष पालकांनीही सहभागी होत आनंद लुटला . विद्यार्थ्यांनी गवळण, दिंडी, मंगळागौर आदी विविध पारंपरिक नृत्यप्रकार सादर केले. संचालक गौतम पाटील, उपसंचालक डी .एस.माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाने श्रावण महिन्याची बहारदार सुरुवात झाली यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संघटनांचे महिला पदाधिकारी, विद्यार्थी व पालक हजारोच्या संख्येत उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या