सांगली प्रतिनिधी : स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. जयहिंद सेनेचे प्रमुख मा. चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्मार्ट मीटरचा प्रश्न हा केवळ वीज मीटर बदलण्यापुरता मर्यादित नसून, तो सामान्य जनतेच्या हक्कांचा आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न असल्याचे कृती समितीने निवेदनात म्हटले आहे. आधीच महागाई, बेरोजगारी, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध करांचा आर्थिक भार नागरिकांवर वाढत असताना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक बोजा पडण्याची भीती सामान्य नागरिकांमध्ये असल्याचे समितीने नमूद केले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, असे निर्देश दिलेले असतानाही संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून नागरिकांवर स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
घरात कोणी नसताना, महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अथवा दबावाच्या मार्गाने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास अशा प्रकारांना लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर चौकटीत राहून विरोध केला जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
“हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरोधातील लढा आहे,” अशी भूमिका चंदनदादा चव्हाण यांनी व्यक्त केली. आगामी काळात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संपूर्ण जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. युनूस महात, श्री. नितीन मिरजकर, श्री. जैलाब शेख, श्री. महेश मासाळ, श्री. सलीम पन्हाळकर, श्री. सुभाष तोडकर, श्री. अमोल माने, श्री. दत्ता पाटील, श्री. गोरख व्हनखंडे, श्री. आदर्श नलवडे, श्री. सतीश फोंडे, श्री. विजय बल्लारी, श्री. सुरेंद्र गायकवाड, श्री. गॅब्रियल तिवडे, श्री. शिवाजी कोळेकर आदी उपस्थित होते.
“स्मार्ट मीटरची सक्ती थांबलीच पाहिजे; जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
एकीकडे शक्तीपीठ महामार्गाची सक्ती तर दुसरीकडे स्मार्ट मीटर ची सक्ती.या सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांना आणि जनतेला लुटायचे ठरविले आहे काय? जरा सुखाने जगू द्या की लोकांना.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही.महागाई वाढलीय आणि दुसरीकडे सरकार सामान्य जनतेच्या मागे अगदी हात धुवून लागले आहे.या सरकार ला सामान्य जनतेच्या हिताची काही पर्वा नाही. फक्त आणि फक्त ठराविक उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी हे लोक सरकार चालवित आहेत असे वाटते.
उत्तर द्याहटवा