जत : जत तालुक्यातील पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे रखडलेले आवर्तन, शेतकऱ्यांना अपुरा वीजपुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढत्या अवैध धंद्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. या विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जतच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
आंदोलनानंतर प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी आमदार विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, तम्मनगौडा रवि-पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, सुजय शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्ष वगळता विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सात प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन
प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात जत तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावे, पिण्याच्या पाण्याची टंचाई तातडीने दूर करावी, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा करावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत आणि जत तालुक्याचे नामांतर करू नये, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय महसूल आणि पोलिस प्रशासनाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, शेतकऱ्यांची वीज जोडणी सुरळीत करावी, पीक विम्याची प्रलंबित रक्कम मिळवून द्यावी, कृषी योजनांचे अनुदान तातडीने वितरित करावे आणि रखडलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
‘फक्त कागदावरचा विकास नको’
आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात जतच्या विकासासाठी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र सत्ता आल्यानंतर तालुक्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“जतच्या जनतेला केवळ कागदावरील विकास नको आहे. जनतेला प्रत्यक्षात पाणी, वीज, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार हवा आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असे सावंत यांनी सांगितले.
म्हैसाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा करावा आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच महसूल आणि पोलिस प्रशासनाबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा सावंत यांनी दिला.
‘म्हैसाळचे पाणी थांबणे हा जतवर अन्याय’
माजी आमदार विलासराव जगताप यांनी दुष्काळी परिस्थितीवरून सरकारला धारेवर धरले. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती तातडीने लागू कराव्यात. म्हैसाळ योजनेचे पाणी नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने सोडले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
“माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत म्हैसाळ योजनेच्या टप्प्यात जतला पाणी मिळत राहिले. मात्र नवीन आमदारांच्या कारकीर्दीतच तालुक्याला पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप जगताप यांनी केला.
तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्तेवसुली होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले. “दोन नंबरच्या व्यवसाय करणाऱ्यांबरोबर पोलिस ठाण्यातील काही लोकही भागीदारीत धंदे करू लागल्याच्या तक्रारी आहेत. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
तहसील कार्यालय, तलाठी आणि ग्रामसेवक कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचेही जगताप यांनी सांगितले. जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘२७ तलाव कोरडे; पाणी आणि चाराटंचाई गंभीर’
तम्मनगौडा रवि-पाटील यांनी जत तालुक्यातील जलसंकटाकडे सरकारचे लक्ष वेधले. तालुक्यातील तब्बल २७ तलाव कोरडे पडले असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेत असतानाही म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने जत तालुक्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने पाणी, चारा आणि सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते,” असा इशारा त्यांनी दिला.
जनतेच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास मुंबईपर्यंत धडक मारू, असा इशाराही रवि-पाटील यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या अनुदान आणि पीक विम्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रकाश जमदाडे यांनी जत तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची वीज जोडणी ठप्प आहे. ठिबक सिंचन आणि कृषी अवजारांसाठी मिळणारे अनुदान रखडले आहे. अनेक लाभार्थ्यांची घरकुलेही अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
पीक विमा भरूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने कागदी पंचनाम्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जमदाडे यांनी केली.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
महाराणा प्रताप चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. सुमारे तीन तास महामार्ग ठप्प राहिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जत तालुक्यातील पाणी, वीज, सिंचन, दुष्काळ, शेतकरी आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा सर्वपक्षीय आंदोलकांनी दिला.
‘जतच्या जनतेला आश्वासने नकोत; प्रत्यक्ष कृती हवी. पाणी, वीज आणि सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,’ असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या