प्रतिष्ठा न्यूज
मिरज, : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचे महान हॉकीपटू भारतरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रवी रामचंद्र आणि श्री. महेश सूर्यवंशी उपस्थित होते. आरोग्य, तंदुरुस्ती, व्यायाम आणि समाजसेवा यांचा प्रभावी संगम घडवणारे हे दोन्ही मान्यवर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले. "खरी तंदुरुस्ती म्हणजे केवळ निरोगी शरीर नव्हे, तर समाजासाठी कार्य करणारे संवेदनशील मन," असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि सर्व खेळाच्या साहित्यात ची पूजा व श्रीफळ अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर धावणे, रिले रेस, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. या खेळाचे नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षक अमोल जाधव, चंद्रशेखर मिरजे आणि दीक्षा पोळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग व प्रशासक रफिक तांबोळी ,उप मुख्याध्यापिका पदमा सासनूर, समन्वयिका अश्विनी येळकर आणि सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.या खेळाच्या माध्यमातून शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त ॲड.वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. क्रीडा, आरोग्य आणि समाजसेवेचा सुंदर संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी, सक्रिय आणि जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा निर्माण झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या