प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सोलापूर येथील श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाज कालिका देवस्थान यांच्या वतीने पांचाळ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील मिलिंद सुतार यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.मिलिंद सुतार यांनी गेल्या सुमारे १५ वर्षांपासून ग्राहक संरक्षण क्षेत्रात लेखन, वाचन आणि प्रबोधन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सातत्याने आणि निष्ठेने कार्य केले आहे. ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती निर्माण करणे, ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधनात्मक कार्य करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.समाजहिताच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत सोलापूर येथील श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाज कालिका देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत तब्बल दीड दशक ग्राहकहितासाठी केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.मिलिंद सुतार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तासगावसह सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्राहक चळवळीतील सहकारी आणि समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या