संग्रामपूर प्रतिनिधी : राजकीय दबावाला कंटाळून संग्रामपूर तालुक्यातील ग्राम करमोडा येथील विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक 11 ऑगस्ट 2026 रोजी घटना घडली आहे. सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
ही घटना लोहगाव शिवारातील गट क्रं 69 मधील शेतात घडली. सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी समाज माध्यमावरील स्टेटसला व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी वैभव उर्फ भैय्या दादाराव वर्गे याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. आरोपीकडून गेल्या तीन वर्षांपासून सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून सातत्याने दबाव आणला जात होता. तसेच कुटुंबाला संपविण्याची धमकीही देण्यात येत होती. आरोपीचे राजकीय प्राबल्य मोठे असल्याने त्याची जमानत झाल्यावर कुटुंबियांना धोका असल्याची भीती त्यांनी व्हिडिओतून व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला
या प्रकरणी मृत सरपंचाचे बंधू श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी वैभव उर्फ भैय्या दादाराव वर्गे याच्याविरुद्ध कलम 108, 351(3) भारतीय न्याय संहिता 2023नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या