प्रतिष्ठा न्यूज दिपक शिंत्रे
विजयपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक गांधी चौकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, आगामी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग, पायाभूत सुविधा विकास व विजयपूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
मंत्री एम. बी. पाटील यांनी शहरातील त्यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन गांधी चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा आराखडा, रचना तसेच पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला ऐतिहासिक गांधी चौक अनेक वर्षांपासून जुन्याच स्वरूपात आहे. चौकातील महात्मा गांधींचा पुतळाही लहान असून, झपाट्याने विकसित होत असलेल्या विजयपूर शहराच्या सौंदर्याला साजेसे असे या चौकाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
सत्य, अहिंसा, शांतता आणि समानतेचा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या महात्मा गांधींचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांच्या स्मृतीला अधिक अर्थपूर्ण स्वरूप देण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी संपूर्ण गांधी चौकाचे सुशोभीकरण करून तेथे भव्य महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
गांधी चौकाचे आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करून तेथे भव्य गांधी पुतळा उभारण्याच्या दृष्टीने विजयपूर नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व आयुक्तांना यापूर्वीच निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद कुसूर यांनी तयार केलेला नूतनीकरणाचा आराखडा मंत्री पाटील यांच्यासमोर सादर करण्यात आला.
आराखड्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पाटील यांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. तसेच नूतनीकरणाचे काम तातडीने हाती घेऊन येत्या गांधी जयंतीच्या दिवशी, 2 ऑक्टोबर रोजीच भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष बापूगौड पाटील शेंगुणसी, विजयपूर नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर संबण्णी, आयुक्त राजशेखर डंबळ, नेते अब्दुल हमीद मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या