सांगली, दि. १० जुलै : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली यांच्या वतीने इयत्ता ९ वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात करण्यात आलेल्या बदलांबाबतचा विषय संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन *सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता (Secularism) व समाजवाद (Socialism) या मूलभूत संविधानिक मूल्यांचा स्पष्ट उल्लेख कमी झाल्याची बाब चिंतेची आहे. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रमाणात समजावून सांगितले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात आल्याच्या वृत्तांमुळे शिक्षणातील संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या संदर्भात विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय राज्यघटना ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असून शालेय शिक्षणामध्ये संविधानिक मूल्यांचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये समानता, बंधुता, सर्वधर्म समभाव, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना संविधानाच्या तत्त्वांशी सुसंगत असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी (पवन) वाघमारे, जिल्हा निरीक्षक ऋषिकेश माने, वंचित बहुजन आघाडी, सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे, महासचिव मनोज सनदे, तसेच रोहित कांबळे, मानतेश कांबळे, अक्षय मागाडे, सिद्धार्थ पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या