सांगली प्रतिनिधी : सांगलीतील तरुणांनी साकारलेल्या ‘सजा चौरंगा’ या मराठी लघुपटाने देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवली आहे. समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या लघुपटाची नुकतीच युनायटेड किंगडम (यूके) येथे आयोजित ‘First Time Session – Volume 7’ या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी अधिकृत निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवासाठी भारतातून निवड झालेला हा पहिलाच मराठी लघुपट ठरला आहे.
‘सजा चौरंगा’ या लघुपटाला आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा प्रथम क्रमांक पटकावला. तसेच लघुपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार कु. आर्या सुप्रसाद कुंभार हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय, निर्मिती क्लब नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सजा चौरंगा’ला उत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले असून चौथ्या क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त झाले आहे. शिराळा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच महोत्सवात कु. आर्या कुंभार हिला पुन्हा उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
बालकलाकार कु. आर्या कुंभार हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जपान ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही पटकावला आहे.
‘सजा चौरंगा’ हा लघुपट समाजातील लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या गंभीर विषयावर प्रभावी भाष्य करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेत एक लहान मुलगी स्वसंरक्षणासाठी धैर्याने उभी राहते आणि अन्यायाविरुद्ध लढा देते, अशी प्रेरणादायी कथा या लघुपटातून मांडण्यात आली आहे. सामाजिक संदेश आणि प्रभावी सादरीकरणामुळे या लघुपटाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन प्रणव ज्ञानेश्वर खडके यांनी केले असून प्रसाद कुंभार यांनी कथा व लेखन केले आहे. लघुपटात कु. आर्या कुंभार हिने प्रमुख भूमिका साकारली असून वैभव कोळी, कुणाल मोतुगडे, सोमकांत आणि अक्षय कुंभार यांनी सहकलाकार म्हणून प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
सांगलीतील तरुणांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून मराठी लघुपटसृष्टीसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या