प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ६ : ब्राईट्स सोसायटीच्या वतीने आयोजित 'विचार, वेध आणि वास्तव' या वैचारिक कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी समकालीन भारतीय राजकारणावर भाष्य करताना, "आज केवळ विरोधी पक्षांवरच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांवरही भीती व दडपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही लोकशाहीसमोरील गंभीर बाब आहे," असे मत व्यक्त केले.
विश्रामबाग येथील उत्कर्ष हॉलमध्ये ५ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना केतकर यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीवरही भाष्य केले.
स्वातंत्र्याच्या वेळी देशाची सूत्रे धर्मांधांच्या हाती गेली असती, तर भारताची राजकीय व सामाजिक दिशा वेगळी असती. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक शिक्षण, औद्योगिकीकरण, संशोधन संस्था आणि लोकशाही मूल्यांवर आधारित धोरणांमुळे भारताने आधुनिक राष्ट्र म्हणून प्रगतीची वाट धरली, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल खरे यांनी प्रास्ताविक केले. ब्राईट्स सोसायटीचे संस्थापक कुमार नागे यांनी 'सीड बॉम्ब' या संकल्पनेच्या माध्यमातून विवेकवाद, बुद्धीप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विचारांची उपमा देत, आज या विचारांभोवतीचे संरक्षणात्मक सामाजिक व शासकीय वातावरण कमकुवत होत असल्याची खंत व्यक्त केली. अंधश्रद्धा, धार्मिक ध्रुवीकरण आणि भावनिक राजकारणामुळे विवेकवादी विचारांसमोर मोठी आव्हाने उभी राहत असली, तरी योग्य वेळी ही विचारबीजे नव्या सामाजिक परिवर्तनाचे अंकुर फुलवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
राजकीय व पर्यावरण अभ्यासक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी आपल्या भाषणातून धर्मचिकित्सा, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची संतुलित मांडणी केली. धार्मिक श्रद्धांचा चिकित्सक विचार करतानाही समाजात अनावश्यक तणाव निर्माण न करता विवेकाचा मुद्दा प्रभावीपणे मांडता येतो, हे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. समाजमाध्यमांवरील गोंधळ आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन तर्कशुद्ध विचार ऐकण्याची तरुणांची तयारी असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. त्यामुळे अशा वैचारिक कार्यक्रमांची व्याप्ती आणि पोहोच वाढविणे ही काळाची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खरे यांनी केले, तर धनंजय आरवाडे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या