सांगली | प्रतिनिधी : लडाखमधील पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण आणि घटनात्मक मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने लडाखच्या जनतेच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या पर्यावरण संवर्धन, स्थानिकांना न्याय आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. गांधीवादी आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून मिळणारा पाठिंबा हा लोकशाही बळकट करणारा असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
निदर्शनादरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडताना, लडाखमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, स्थानिकांच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. देशाच्या कोणत्याही भागातील जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात कॉम्रेड उमेश देशमुख, ॲड. अजित सूर्यवंशी, सतीश साखळकर, रविंद्र वळवडे, विकास मगदूम, शंभूराज काटकर, वि. द. बर्वे, डॉ. संकेत पाटील, नितीन चव्हाण, आयुब पटेल, जयपाल चौगुले, प्रा. मासुले सर, नितीन मिरजकर यांच्यासह विविध सामाजिक, पुरोगामी व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, युवक-युवती आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
निदर्शनाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवत, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि लडाखच्या जनतेच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या