प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. २० :मिरजेतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या शिक्षण संस्थेचा ३४ वा वर्धापन दिन संस्थेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी माजी खासदार, सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील व केंब्रिज स्कूलच्या शिल्पकार स्व. संयोगिता पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
स्वागत गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप भोसले तर प्रास्ताविक प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी रजिस्ट्रार प्रा. बापू जाधव यांनी स्व. गुलाबराव पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले व त्यांची स्मृती जपणाऱ्या गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणजे पहाडात लेणी खोदणारा असा सार्थ उल्लेख केला. ते म्हणाले, "बाबांनी तन, मन व धनाने समर्पण करुन संस्था नावारूपाला आणली आहे. कामगारांना सन्मान देणारी ही संस्था आहे. संस्थेवर प्रेम करा, आत येताना संस्थेच्या उंबरठ्याला नमस्कार करा. ती आपल्याला भाकर दिलेली संस्था माऊली आहे. वाचन करा, कितीही भौतिक प्रगती करा पण माणूस व्हायला विसरु नका. साने गुरुजी होणे ही गरज आहे. “नव्या पिढीने नवे तंत्रज्ञान जरुर घ्यावे परंतु संस्कार आणि माणुसकी केंद्रस्थानी ठेवून झोकून देऊन काम करावे."
संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालीत सेवकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत राज्यात जीपीएमटीचा विद्यार्थी अभिजित डुबल हा पहिला आला त्याचे अभिनंदन करु या." असे म्हणून यावेळी त्यांनी ट्रस्टच्या तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला व लवकरच होमिओपॅथी कॉलेज मध्ये पदव्युत्तर वर्ग सुरु करणार असल्याचे सांगितले. सर्वांनी मिळून संस्थेच्या विस्तारासाठी कटीबध्द होऊ या असे आवाहन करुन त्यांनी ३४ वर्षांपूर्वी सहकार, शिक्षण आणि सेवा या तत्त्वांवर उभा राहिलेला गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आज समाजाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, ही बाब गौरवास्पद आहे असे नमूद करुन या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील म्हणाले, " जून २०२७ पासून संस्थेचे नवी मुंबई येथील सीबीएसई स्कूल सुरु होत आहे. स्व. संयोगिता पाटील यांच्या कष्टातून उभे राहिलेल्या केंब्रिज शाळेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम व इमारत उदघाटन समारंभाचेही लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. केंब्रिज स्कूल मध्ये एआय लॅब उभारणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एआय तंत्रज्ञानाचा आता सर्वच क्षेत्रात वापर सुरु होणार आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता सक्षम बना. मोठी स्वप्नं बाळगा व ती सत्यात उतरण्यासाठी मुलांना एक्स्पोजर द्या. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्यांची अंमलबजावणी करा."
यावेळी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज मधील लॅब टेक्निशियन साहेबराव डुबल यांचे चि. अभिजित साहेबराव डुबल या विद्यार्थ्यांने संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अंतिम वर्ष बीएचएमएस मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच त्याने प्रॅक्टीस ऑफ मेडीसीन आणि रेपर्टरी या दोन विषयात सुवर्णपदक मिळविलेले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी अभिजित व त्यांच्या आई, वडीलांचा सत्कार केला व अभिजितला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, प्रा. प्रदीप पाटील, समन्वयक प्राचार्य सतीश पाटील, सौ. विजया पाटील, सौ. प्राजक्ता पाटील, संस्थेच्या शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विश्वस्त प्रा. प्रदीप पाटील तर सूत्रसंचालन प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या