सांगली, दि. ४ : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, सांगली यांच्या वतीने सन २०२६-२७ हे वर्ष "शाश्वत मानवतावादी वर्ष" म्हणून साजरे करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. समता, मानवता, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते आणि कार्याध्यक्ष शेखर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत भव्य मशाल रॅली, दहा हजार वृक्षारोपण अभियान, वक्तृत्व स्पर्धा, एक लाख रक्तदाते अभियान, अभिवादन सभा, पर्यावरण जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जुलै रोजी सांगली शहरातून मशाल रॅली काढून समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. २ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण अभियान, ३ ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा आणि ४ ऑगस्ट रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय वर्षभर स्वच्छता अभियान, व्याख्याने, परिसंवाद तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
समितीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे कृतीत रूपांतर करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या सर्व कार्यक्रमांना डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे आणि संस्थापक अध्यक्षा सावित्रीबाई साठे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेला अध्यक्ष सतीश मोहिते, कार्याध्यक्ष शेखर मोहिते यांच्यासह दलितमित्र अशोक पवार, शेवंता वाघमारे, कुलदीप देवकुळे, आसिफ बावा, आकाश तिवडे, ग्रॅबियेल तिवडे तसेच समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान यावेळी खासदार विशाल पाटील व आमदार सदाभाऊ खोत यांनी बैठकीस भेट देऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करू. तसेच यावेळी सांगलीत त्यांचा भव्य पुतळा व स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या