सांगली, दि. ४ : बुद्धिबळ भीष्माचार्य तथा नूतन बुद्धिबळ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बेसिक शास्त्रशुद्ध बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुरज फाउंडेशनच्या सहकार्याने आणि नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली यांच्या वतीने सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला तसेच नव कृष्णा व्हॅली इंग्लिश व मराठी स्कूल येथे आयोजित प्रशिक्षण वर्गात एकूण ५२ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयीची आवड वाढत असून ते खेळाचा मनापासून आनंद घेत आहेत.
प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेतील प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संदीप वरटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात मोहिनीराज डांगे मार्गदर्शन करीत आहेत.
प्रशिक्षण वर्गाच्या प्रारंभी भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रा. रमेश चराटे, डॉ. उल्हास माळी, प्रा. सीमा कठमाळे, सचिव चिंतामणी लिमये, दीपक वायचळ, अथर्व आलदर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नव कृष्णा व्हॅली स्कूल (इंग्रजी माध्यम)चे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण आणि स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सुशांत सूर्यवंशी, यश माळी, सौंदर्या पाटील तसेच पौर्णिमा आणि सन्मित्र पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, निर्णयक्षमता आणि संयम विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक जोशी, सुशांत सूर्यवंशी, विनायक ऐनापुरे आणि दीपक वायचळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या