प्रतिष्ठा न्यूज
मिरज, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात विनानंबर प्लेट, बनावट (फॅन्सी) नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून ४२ दुचाकी चालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विविध पथकांनी शहरातील प्रमुख रस्ते, शाळा-महाविद्यालये, रुग्णालय परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.
या तपासणीत विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट लावलेली तसेच ट्रिपल सीट प्रवास करणारी वाहने आढळून आली. संबंधित वाहनांची कागदपत्रे आणि इंजिन क्रमांक तपासून चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली.
सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधातील मोहीम पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी संशयास्पद वाहने किंवा अशा प्रकारची माहिती डायल ११२ वर कळवावी, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या