पलूस/खानापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ७ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकरी मुंबईकडे रवाना होणार आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार व मंत्रिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये संघर्ष समितीच्या नियोजन बैठका सुरू आहेत.
याच अनुषंगाने शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी खानापूर तालुक्यातील भाग्यनगर ग्रामपंचायत कार्यालयात पलूस-कडेगाव-खानापूर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दिपक लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. बैठकीस भाग्यनगर परिसरातील शेकडो शेतकरी, महिला शेतकरी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
यावेळी बोलताना अॅड. दिपक लाड म्हणाले, "शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्याची पहिली ठिणगी भाग्यनगरमधून पेटली. त्या दिवसापासून येथील महिला शेतकरी आंदोलनात नेहमीच एक पाऊल पुढे राहिल्या आहेत. मुंबईतील मोर्चातही भाग्यनगरच्या महिलांची भूमिका विशेष लक्षवेधी असेल. त्यांच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो."
भाग्यनगर येथून सुमारे चार ट्रॅव्हल्स भरून शेकडो आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच पलूस, कडेगाव आणि खानापूर या तिन्ही तालुक्यांतून हजारो शेतकरी मुंबई आंदोलनात सहभागी होणार असून त्यासाठी गावागावांत नियोजन बैठका आणि पूर्वतयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई आंदोलनासाठी व्यंकटेश्वर ट्रॅव्हल्सचे प्रमुख महेश कुपाडे हे शेतकऱ्यांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
बैठकीस संघर्ष समितीचे महेश कुपाडे, किरण चव्हाण, दीपक कदम यांच्यासह महादेव जगताप, संताजी जगताप, अनुराज काटकर, नागनाथ नगरचे माजी चेअरमन संभाजी निकम, भीमराव निकम, मनोज निकम, अक्षय सूर्यवंशी आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या