प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होत असतानाच दोन्ही तालुक्यांतील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित (आर.आर.) पाटील यांनी मंत्रालयात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तलाव, बंधारे व जलसाठे तातडीने भरून देण्याची मागणी केली. या मागणीची गंभीर दखल घेत संबंधित योजनेचे प्रलंबित बिल निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.आमदार रोहित पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपलब्ध सिंचन योजनांमधून तलाव, बंधारे आणि इतर जलसाठे तातडीने भरून देण्याची त्यांनी मागणी केली.यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित योजनेचे सुमारे १० कोटी रुपयांचे प्रलंबित बिल महामंडळामार्फत अदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.ही प्रक्रिया पूर्ण होताच पुढील दोन ते तीन दिवसांत मागणीनुसार पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार रोहित (आर.आर.) पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच हा सकारात्मक निर्णय शक्य झाल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता पुढील दोन-तीन दिवसांत प्रत्यक्षात पाणी सोडण्याच्या निर्णयाकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या