सांगली प्रतिनिधी : आजच्या काळात युवकांविषयी बोलताना मोबाईलचे व्यसन, मौजमजा, व्यसनाधीनता आणि वाढती गुन्हेगारी यांचीच चर्चा अधिक होताना दिसते. अनेक तरुण क्षणिक आकर्षणांच्या मागे धावत असताना, समाजासाठी स्वतःचा वेळ, श्रम आणि आयुष्य समर्पित करणारे काही युवक मात्र आशेचा किरण ठरत आहेत. सांगली शहरातील 20 तील युवक राकेश व टीमने गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य अविरत सुरू ठेवत एक प्रेरणादायी इतिहास घडवला आहे.
३००० दिवसांचा हा प्रवास केवळ एका स्वच्छता अभियानाचा टप्पा नाही, तर सातत्य, निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा जिवंत आदर्श आहे. आजच्या युवकांसमोर सकारात्मक दिशा निर्माण करणारे हे कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. समाजात बदल घडविण्यासाठी मोठ्या पदाची किंवा संपत्तीची नव्हे, तर प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज असते, हे राकेश दड्डणावर व युवकांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
स्वच्छतादूत राकेश दड्डणावर यांच्या नेतृत्वाखाली १ मे २०१८ रोजी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने आज सलग ३००० दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ही मोहीम आज महाराष्ट्रभर प्रेरणा देणारी लोकचळवळ बनली आहे. रस्ते,बागा, सार्वजनिक ठिकाणे,चौक,नाले,गटारी, स्मशानभूमी ,नदीकाठ स्वच्छता व मनपा शाळा दत्तक तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे या युवकांनी हजारो नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे...
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधत सांगली संस्थानचे राजेसाहेब हिज हायनेस विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत ३००० दिवसांचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजेसाहेबांच्या हस्ते केक कापून या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर राकेश व टीमला पुष्पगुच्छ व शुभेच्छा संदेशपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय अविरत सेवा करणाऱ्या या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राजेसाहेबांनी त्यांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले.
यावेळी बोलताना हिज हायनेस विजयसिंहराजे पटवर्धन म्हणाले, "आपण घाण करायची आणि ती दुसऱ्यांनी स्वच्छ करावी, ही मानसिकता बदलली पाहिजे. स्वच्छ शहर घडविण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. प्रत्येक सांगलीकराने स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. राकेश दड्डणावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य समाजहिताचे आणि अनुकरणीय आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे. त्यांच्या कार्याला अखंड यश, उत्तम आरोग्य लाभो आणि अधिकाधिक युवक या चळवळीशी जोडले जावोत, ही श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे.
स्वच्छता दूत राकेश दड्डणावर म्हणाले, "महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात असताना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने आम्ही ही मोहीम सुरू केली. त्या वेळी हा प्रवास इतका मोठा होईल, याची कल्पनाही नव्हती. मित्रांचे सहकार्य, सांगलीकरांचा विश्वास आणि हजारो स्वयंसेवकांच्या पाठिंब्यामुळे हे छोटे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. ही मोहीम आता केवळ सांगलीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर महाराष्ट्रभर पोहोचली आहे. अनेक स्वच्छता मोहिमांमध्ये मोठा लोकसहभाग लाभला आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संस्कार जनमानसात रुजेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. २०४७ पर्यंत महाराष्ट्रात एक कोटी स्वच्छतादूत घडविण्याचा आम्ही आज संकल्प करीत आहोत.
यावेळी राणीसाहेब राजलक्ष्मीराजे पटवर्धन,जयदीप अभ्यंकर, जिल्हाप्रमुख सतीश कट्टीमनी, विभागप्रमुख रोहित मोरे, गणेश चलवादे, किरण बेळंकी तसेच निर्धार फौंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या