प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देण्यासाठी व सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून व्यापक जनचळवळ उभारण्याच्या उद्देशाने *"विकसित सांगली २०४७ परिसंवाद* " रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७.३० या वेळेत वेलणकर सभागृह, विलिंग्डन महाविद्यालय, विश्रामबाग, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकसित सांगली अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या विषयाच्या व्याप्ती साठी, विकसित सांगली अभियानासाठी लोकसहभाग या पुस्तक निर्मितीचे काम सुरु आहे. पुस्तक निर्मिती पूर्व विषय तज्ञ यांच्या गटचर्चेसाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात जिल्ह्यातील पर्यावरण, आरोग्य, नैसर्गिक शेती, उद्योग, ग्रामविकास आदी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने अध्यक्षस्थानी राहतील. तर कोल्हापूर विभाग कार्यवाह विजयराव जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या परिसंवादामध्ये "विकसित सांगली अभियानातील लोकसहभाग" या प्रस्तावित पुस्तकासाठी विविध विषयांवरील तज्ज्ञांचे विचार, सूचना आणि लेख संकलित करण्यात येणार आहेत. पर्यावरण संरक्षण, आरोग्य, नैसर्गिक शेती, उद्योग, ग्रामविकास आणि नागरिकांचा सहभाग या विषयांवर सखोल चर्चा होणार असून, विकसित सांगली २०४७चा लोक सहभागावर आधारित कृती आराखडा तयार करण्यासाठी या परिसंवादातून दिशा मिळणार आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि जागरूक नागरिकांनी या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे आपले व्हिजन आम्हाला कळवावे, अधिक माहितीसाठी ७५८८९५४५८०, ८४८४९०१५९७ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन विकसित सांगली अभियान समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या